नात्यात गुंफली यशवंत कारखान्याची निवडणूक
सोरतापवाडी प्रतिनिधी सचिन सुंबे – थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ९ मार्च रोजी होणार असून ही निवडणूक नात्यागोत्यात व सगे सोयऱ्यांच्यात गुंफली असल्याचे दिसून येत आहे . आर्थिक अनियमित्यामुळे २०११ ला थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद पडला . त्यानंतर तेरा वर्षांनी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली . त्यानंतर २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक निवडणूकीची घोषणा प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा जिल्हा सहकारी निवडणूक आधिकारी निलिमा गायकवाड व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शीतल पाटील यांनी घोषित केली .९ मार्च २०२४ रोजी मतदान होणार असुन १० मार्चला मतमोजणी होणार आहे .त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना ३२० या उच्चांकी उमेदवारी अर्ज आले.
त्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्याचे सर्व प्रयत्न सुरू झाले. परंतु निवडणूक बिनविरोध न होता निवडणुकीमध्ये दोन पँनल तयार झाले . अण्णासाहेब मगर रयत सहकार पँनल व अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी असे दोन पॅनल तयार होऊन दोन्ही पॅनलच्या प्रचाराचे नारळ फुटुन प्रचार जोरात सुरू झाला .त्यातच उत्पादक सहकारी संस्था , बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था या गटातून सागर अशोक काळभोर यांना त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय गायकवाड यांनी माघार घेऊन संपूर्ण पाठिंबा जाहीर केल्याचे पत्रक पत्रकार परिषदेमध्ये सादर केले.
त्यामुळे या गटात सागर अशोक काळभोर यांचा विजय निश्चित झाला असून त्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे. एकंदरीत दोन्ही पॅनलचे उमेदवार पाहता ही निवडणूक नात्या गोत्यात व सगे सोयऱ्यांच्यात गुंफली असल्याचे दिसून येत आहे यशवंत कारखान्याच्या निवडणुकीचा इतिहास बघितला तर कारखान्याच्या निवडणुकीत नात्या गोत्यांची आणि सगे सोयऱ्यांची भुमिका अतिशय महत्त्वाची असून याही निवडणुकीत नातीगोती व सगेसोयरे उपयोग येतात का हे १० मार्चला कळणार असल्याचे सभासदांनी सांगितले. कांचन , काळभोर ,काकडे , काळे , उंद्रे चौधरी , कोतवाल , गावडे , गायकवाड , घुले , हरपळे , कामठे पवार , म्हेत्रे , टिळेकर , कानकाटे , आतकिरे ,दरेकर ही सर्व आडनावाची मंडळी एकमेकांचे नातेवाईक सगे सोयरे असून निवडणुकीला एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत . त्यामुळे नात्यात गोत्यात गुंफलेले पाहुणे कुणाच्या बाजूने मतदान करतील यावरच यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या भावी संचालकांचे भवितव्य अवलंबून असून दोन्ही पॅनलने पॅनल टु पँनल मतदान करण्याचे आवाहन सग्या सोयऱ्यांना केले आहे .



